गुरुपौर्णिमा


आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे.

        आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.


        महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व इलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.

        देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. ह्या राणीला दोन पुत्र झाले. पण ते दोघेही निपुत्रिक वारले. राज्याला वारस उरला नाही. राणी सत्यवती मनोमन व्याकुळ झाली आणि त्या तळमळीतून तिला एक वेगळीच कल्पना सुचली. ती कल्पना त्या काळच्या सामाजिक समजुतीला आणि रीतीरिवाजाला धरून होती. आपला पूर्वीश्रमीचा पुत्र व्यास याने अपला वंश वाढवावा अशा कल्पनेने तिने व्यासांनी नियोगपद्धतीचा अवलंब करून आपल्या सुनांच्या ठिकाणी संतति निर्माण करावी, असा आग्रह धरला. व्यासांना हे मुळीच मान्य नव्हते. त्यांनी नानाप्रकारे आईला ह्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सत्यवतीच्या अतीव आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. स्वत:च्या मर्जीविरुद्ध त्यांना तिचे म्हणणे मानणे भाग पडले आणि सत्यवतीच्या दोन्ही सुनांना दोन मुलगे झाले. पहिला धृतराष्ट्र आणि दुसरा पंडू. धृतराष्ट्राची संतति कौरव आणि पंडूची संतति पांडव! ह्याच कौरव-पांडवांचे युद्ध हे महाभारताचे मुख्य कथाबीज. व्यासांचे कौरव-पांडव ह्या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. ह्या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उद्धस्त झाली असेल त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते.

        गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेल उपदेश आहे.

        व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धर्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते.

म्हणौनि भारतीं नाहीं तें न्हवे चि लोकीं तिहीं, एणें कारणें म्हणिपे पाहीं व्यासोच्छिष्ट जगत्रय

        असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. प्रात:स्मरणात व्यासांच्या नमनाचा जो श्लोक आहे त्यात आधीच्या तीन, पुढची एक आणि मधले व्यास धरुन एकूण पाच पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे. https://www.facebook.com/JayatuHindurashtra/ व्यासं वसिष्टनप्तारं, शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वंदे, शुकतातं तपोनिधिम् कोण? तर व्यास वसिष्ठांचा पणतू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकाचा पिता.

            ॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
            गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥
        या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या शिवरायांनीरामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे.

सामन्यत: गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षिस किंवा मोबदला असा समजला जातो. परंतु गुरुदक्षिणा म्हणजे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तसंच जनकल्याणासाठी त्याचा योग्य वापर. गुरुदक्षिणा गुरुप्रती समर्पण आणि सन्मान या भावनाचं प्रतिक आहे. साधकासाठी हा दिवस महत्वाचा असतो. या दिवशी कृष्ण मंदिर, दत्तमंदिर तसंच साई मंदिरात हा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. नारायणपुरच्या दत्तमंदिर आणि शिर्डीच्या साई मंदिरात भाविक मोठया प्रमाणावर गर्दी करतात, अनेक साधक मठांमध्ये आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमतात. शास्त्रीय संगीत तसंच नृत्य क्षेत्रातले कलाकार या दिवशी कार्यक्रम आयोजित करुन गुरुप्रती आदर व्यक्त करतात. प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
        गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु व वाईट सवयी यांच्या आहारी जातात.

जयतु हिंदुराष्ट्रम्


No comments:

Post a Comment